प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या विकृत मानसिकतेचा भयानक चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरजवळ फेटरी येथील ओयो हॉटेलमध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकरानेच प्रेमाच्या कारणावरून चाकूने वार करून तरुणीचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत तरुणीचे नाव कु. रुचिता राजेश भांगे (वय 21) असे असून ती धनवटे कॉलेज, नागपूर येथे बी.ए. फायनलचे शिक्षण घेत होती. रुचिता ही पोलीस भरतीची तयारी करत होती. आरोपी सौरभ उर्फ बिट्टू जामगडे (रा. आष्टी) याच्याशी तिचे मागील काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी सौरभ हा गेल्या काही दिवसांपासून रुचिताला सातत्याने त्रास देत होता. पोलीस भरतीच्या सरावासाठी ग्राउंडवर गेली असता आरोपी तेथे येऊन शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. चार दिवसांपूर्वी त्याने रुचिताला मारहाण करून तिचा मोबाईलही हिसकावून नेल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने वडिलांना दिली होती.

दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून रुचिता बेपत्ता झाली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी 23 जानेवारी रोजी सकाळी धक्कादायक सत्य समोर आले.
फेटरी येथील ओयो हॉटेलमधील खोली क्रमांक 105 मध्ये रुचिताचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. तिच्या बाजूलाच रक्ताने माखलेला चाकू पडलेला होता. प्राथमिक तपासात आरोपी सौरभ याने रुचिताला ओयो हॉटेलमध्ये आणून प्रेमप्रकरणाच्या वादातून चाकूने वार करून निर्घृणपणे ठार मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या गुन्ह्यांना आळा कधी बसणार?
तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
